मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या तरुणाला सुरक्षित उतरवले

Man Threatens To Commit Suicide After Climbing The Mantralaya Building

मुंबई : मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या आनंद उर्फ ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतक-याला दीड तासाच्या अवधीनंतर अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित खाली उतरवण्यात आले. ज्ञानेश्वर हा उस्मानाबाद जिल्ह्यातून कृषीमंत्री पाडुंरंग फुंडकर यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आला होता. मात्र त्याला भेट न मिळाल्यामुळे त्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे येथील परिसरात गोंधळ उडाला असून बघ्यांची गर्दी जमली होती.सोयाबीनला भाव द्या आणि स्वामिनाथन आयोग लागू करा अशा दोन मागण्या ज्ञानेश्वरने केल्या होत्या. त्यानंतर सरकारकडून लिखीत स्वरुपात आश्वासन मिळाल्यानंतर ज्ञानेश्वरला सुरक्षित खाली उतरवण्यात आले. ज्ञानेश्वर साळवेच्या धमकीने मंत्रालयात खळबळ उडाली होती. मात्र या घटनेला तब्बल ४५ मिनिटे उलटल्यानंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील व त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे घटनास्थळी दाखल झाले.