युवा दिनविशेष; यंत्रांच्या दुनियेतील अभियंते सुरांनी करतात मंत्रमुग्ध

औरंगाबाद – चिंतन करा,नव्या विचारांना जन्म द्या. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा असा मूलमंत्र देणारे, तरुणांचे स्फूर्तीस्थान स्वामी विवेकानंद. आपल्या आवडीनुसार ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या आजच्या पिढीचे स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान ठरतात. स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस ‘ जागतिक युवा दिवस ‘ म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र देशाने औरंगाबाद शहरातील युवा गायक, हार्मोनियम वादक आणि अभियंते पद्मनाभ जोशी, धनंजय गोसावी यांच्याशी संवाद साधला.

गोड गळ्याचा अभियंता : पद्मनाभ जोशी
औरंगाबाद शहरात गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या पद्मनाभ जोशी याने वयाच्या ९ व्या वर्षापासून गुरु राजप्रसाद धर्माधिकारी यांच्याकडे हार्मोनियमचे तर आई अश्विनी जोशी यांच्याकडे गायकीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे गाण्यासाठी दिली जाणारी सिनियर आणि ज्युनियर शिष्यवृत्ती त्याने मिळवली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून, सोबतच संगीत विषारद ही संगीतातील पदवी देखील मिळवली. हे सगळे सुरू असताना गाण्याचा रियाज कधीही थांबला नाही. विविध कार्यक्रमात गायनही सुरूच होते. आपल्या गुरुने ज्या तळमळीने आपल्याला संगिताचे धडे दिले त्याच तळमळीने त्याला विद्यार्थी घडवायचे आहेत. त्यामुळे त्याने ‘कलाकट्टा’ येथे गाण्याचे क्लासेस सुरू केले आहेत. भविष्यात स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

गझलांचा बादशाह : धनंजय गोसावी
वयाच्या ८ व्या वर्षापासून वडिल अनिल गोसावी यांच्याकडे हार्मोनियमचे धडे गिरवणाऱ्या धनंजयचा प्रवास देखील गायक ते अभियंता आणि पुन्हा एकदा गायक असा आहे. वयाच्या ८ व्या वर्षापासून हार्मोनियम वादन ,गायनास त्याने सुरुवात केली. प्रमोद जोशी यांच्याकडे ७ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले सोबतच इंजीनियरिंग देखील सुरु होते. मात्र तांत्रिक शिक्षणानंतर त्याने पूर्ण वेळ संगीतास द्यायला सुरुवात केली. २०१८ मध्ये अतुल दिवेंकडे सुगम संगीत, गझल शिकण्यास सुरुवात केली. आज वयाच्या २४ व्या वर्षी १० वर्षे ते ५० वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तो गाण्याचे प्रशिक्षण देत आहे. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शहरात एक उद्योन्मुख कलाकार म्हणून तो आज नावारुपास येत आहे. भविष्यात पार्श्वगायक, संगीतकार म्हणून काम करणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या