मोदींचा वाढदिवस युथ कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार 

modi

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह अन्य मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यांमध्ये लसीकरण मोहीम, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, एका बाजूला भाजपकडून मोदींचा वाढदिवस स्पेशल बनविण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस देखील देशभरात साजरा करणार आहे. हा वाढदिवस  युथ काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार आहे. बेरोजगारी दिवसाच्या अंतर्गत काँग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल.

दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं, याचीच आठवण युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली. ते म्हणाले की, ‘रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर 2.4 टक्क्यांवरून 10.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय,’ अशी टीका श्रीनिवास यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या