शेतकऱ्यांना समाधानकारक आर्थिक मोबदला न दिल्यास रस्त्यावर उतरु, युवक कांग्रेसचा इशारा

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्यपाल महोदयांनी जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत तुटपुंजी असल्याने महाराष्ट्रातील मुख्यत्वे विदर्भातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. राज्यपाल महोदयांनी आठ हजार रुपये हेक्टरी मदत देतांना कुठले निकष लावलेत ?मदतीच्या नावावर शेतकऱ्यांची ही थट्टाच आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार युवक कॉंग्रेस कदापी खपवून घेणार नाही. अशी टिका युवक कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी सततची नापिकी व दुष्काळामुळे त्रस्त झाले असून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. ह्यावर्षी सुद्धा परतीच्या पावसाने शेतकर्यांचे पीक मातीमोल होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना समाधानकारक आर्थिक मोबदला न दिल्यास जिल्ह्याजिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशारा देखिल ढोके यांनी दिला आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

यंदाच्या खरिपात ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्टरवर खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायत, तर ३२ हजार हेक्टरवरील फळपिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या