पेट्रोल-गॅस दरवाढी विरोधात युवक कॉंग्रेसने केला मोदींचा निषेध

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस आयोजित पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात व विधानसभेत आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरातही शहर युवक काँग्रेसच्या वतीने राज पेट्रोल पंपावर मोदींचा निषेध म्हणून ‘मै ना कुछ बोलुंगा’,मै ना कुछ देखूंगा,मै ना कुछ सुनुंगा’ हे फलक लावून पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले.

कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात महागाईने डोके वर काढल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पेट्रोल, डिझेलबरोबर गॅसच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाल्याने गृहिणींना तर घरखर्च सांभाळताना तारांबळ उडत आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरची होणारी भाववाढ परवडेनाशी झाली आहे.

त्यामुळे शहरातील स्लम वस्त्यांसह शहरालगतच्या खेड्यांमध्ये गृहिणींच्या घरी आता गॅस बंद करून पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अनेकांना अगदी माफक दरामध्ये गॅस देण्यात आले. त्यामुळे घरातील गृहिणींकडून चूल बंद करून गॅसवर स्वयंपाक तयार करण्यात येऊ लागला. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांत सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

या आंदोलनात युवक कॉंग्रेस शहर जिलाध्यक्ष मुजफ्फरखान पठान,प्रदेश प्रवक्ता निलेश अंबेवाडीकर,पुर्व विधानसभा अध्यक्ष मोहसीन खान, प्रदेश सचिव मोईन ईनामदार आदि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या