fbpx

तुमची गुंडगिरी आम्ही तासगावमध्ये येऊन संपवतो; विशाल पाटील यांचे संजय पाटील यांना आव्हान!

सांगली – विद्यमान खासदारांचे गेल्या पाच वर्षातील रिपोर्ट कार्डच काढले तर फक्त दादागिरी, गुंडगिरीच आहे. संसदेत गेलेल्यांनी कमरेला बंदुक लावून फिरणे म्हणजे मर्दुमकी नव्हे. तुमची गुंडगिरी आम्ही तासगावमध्ये येऊन संपवतो, अशा शब्दात आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना आव्हान दिले. स्टेशन चौकात कॉंग्रेस महाआघाडीच्या प्रचार प्रारंभ सभेत ते बोलत होते.

‘आजवर संग बघितलाय आता जंग बघा’ अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी औदुंबर येथील सभेत आव्हान दिले होते.

त्याला उत्तर देताना विशाल पाटील यांनी आज खासदार संजय पाटील यांना लक्ष्य करताना थोडी इतिहासाचीही उजळणी केली. पाटील म्हणाले की, तुम्ही आमदार सुमन पाटील यांना कोंडून ठेवले. हे अशोभनीय वर्तन खासदाराला शोभणारे नाही. आमची वसंतदादांची, प्रेमाची दादागिरी आहे. तुमची काकागिरी आता जिल्ह्याची जनता खपवून घेणार नाही.

खासदार म्हणून तुम्ही संसदेत किती बोललात? केवळ मोठ – मोठ्या थापा मारण्यात पाच वर्षे गेली. केंद्राकडून निधी आणण्यात अपयश आले. भाजपच्या काळात म्हैसाळसाठी केवळ 74 कोटी आले. अन्य योजनांना निधीच आला नाही. प्रतिक पाटील मंत्री असताना एक हजार कोटी आणले होते. खासदारांचे गेल्या पाच वर्षातील रिपोर्ट कार्डच काढले तर फक्त दादागिरी गुंडगिरीच आहे, असे विशाल पाटील यावेळी म्हणाले.