‘पाच वर्षांची असतानाही तूच जबाबदारी सांभाळलीस…’, प्रीतम मुंडेंकडून पंकजांना खास शुभेच्छा

बीड : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आज दि.२६ जुलै रोजी वाढदिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे हे एक मोठे नाव मानले जाते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा यांनी राजकारणाची धुरा समर्थपणे पेलली असे त्यांच्या समर्थकांना वाटते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांमधून त्यांच्यावर वर्षाव होत आहे.

पंकजा यांच्या लहान भगिनी तथा बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाच वर्षांची असतानाही तूच जबाबदारी सांभाळलीस असे म्हणत प्रीतम यांनी काही बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

‘५ वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस! जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’ या शब्दांत प्रीतम मुंडे यांनी अभिष्टचिंतन केले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये असे समर्थक आणि हितचिंतकांना अगोदरच फेसबूकद्वारे सांगितले आहे. वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता गरजूंना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

परळीत बॅनरमधून पंकजा समर्थकांनी पक्षनेत्यांना वगळले
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंचे समर्थक पक्षावर नाराज आहेत. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु या बॅनर्सवर एकाही भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो नसल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या