औरंगाबाद : काल मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा पार पडली. या सभेत फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी फडणवीसांनी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली.
“संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना. आता नाव बदलायची आवश्यकता नाही. सोनिया गांधींची भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत. आता ओ खैरे.. व्हा आता बहिरे.. औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाहीतोपर्यंत संभाजीनगर विसरा. उद्धव ठाकरेंनी सभेत सांगितलं. मॅडम चिंता करू नका. आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही संभाजीनगर नामांतर करत नाही. आम्ही औरंगाबादच ठेवतो, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या ‘उत्तर सभे’त टीका केली होती.
आता फडणवीसांच्या टीकेला चंद्रकांत खैरे यांच्याकडूनही प्रत्युत्तर आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अनेकदा औरंगाबादच्या नामांतरासाठी त्यांना भेटलो. मग तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर का केलं नाही?, असा थेट सवाल खैरे यांनी केला. फक्त शिवसेनेला श्रेय मिळता कामा नये, यासाठी शहराचं नामकरण भाजप शिवसेना सरकारच्या काळात करण्यात आलं नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
फडणवीस आता तर मलाच बहिरे म्हणत आहेत. पण कित्येकवेळा भेट घेऊन, मागणी करूनही फडणवीसांनी संभाजीनगर नामकरणाकडे दुर्लक्ष केलं. आता तेच बहिरे आहेत. मला बहिरे म्हणतात. पण त्यांचे औरंगाबाद मधील ज्येष्ठ नेते आधीच बहिरे आहेत. मला कशाला बोलता तुम्ही, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. असं कडवट प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांना दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :