‘यॉर्करकिंग’ मलिंगाची इनिंग संपली; …म्हणून तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती ?

lasith malinga

नवी दिल्ली : श्रीलंकेचाच नाही तर अवघ्या जगातील दिग्गज यॉर्करकिंग म्हणून नावलौकिक असलेल्या लसिथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. यामुळे आता तो लीग क्रिकेट मध्ये देखील दिसणार नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने तोंडावर आलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात त्याला स्थान न मिळाल्याने त्याने आता तडकाफडकी सर्वच क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्याचं बोललं जात आहे.

याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. मलिंगाने ट्वीट करून म्हटले, ‘मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन.’ यामुळे मलिंगाची खेळाडू म्हणून ‘इनिंग’ संपली असली तरी येत्या काळात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

तब्बल 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला मलिंगाने अलविदा म्हटलं आहे. त्याने 340 सामन्यांत 30 टेस्ट, 226 वनडे आणि 84 टी-20 सामने मलिंगाने खेळले. ज्यामध्ये एकूण 546 विकेट्स घेत त्याने आपला दबदबा निर्माण केला होता. आयपीएलमध्ये देखील त्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्याच्या यॉर्करमुळे अनेक फलंदाजांचा थरकाप उडायचा. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पडल्याचे क्रिकेटरसिकांना पाहिले आहे.

मलिंगाने २०२० च्या मार्चमध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्याने आयपीएल २०२० मधून आपले नावही मागे घेतले होते. दरम्यान त्याने टेस्टमध्ये 101, वनडेमध्ये 338 आणि टी20 मध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या