योगींच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावरून राजकीय वातावरण गरम, विरोधकांचा हल्लाबोल सुरू

नवी दिल्ली : ‘समाजवादी पक्षाचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बाजान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का नव्हते मिळत? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहचत होते. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. दरम्यान, ‘अब्बाजान’ हा शब्द मुस्लीम समाजात वडिलांना हाक मारण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला वेगळं वळण लागलं आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. ‘आमच्या सरकारला पाहिजे आहे : एक सर्वसमावेशक अफगाणिस्तान. परंतू योगींना त्यांच्या ‘अब्बाजान’च्या मुद्द्यावरून काय हवे आहे: एक सर्वसमावेशक उत्तरप्रदेश राज्य किंवा फोडाफोडी करा आणि राज्य करा?” अशी टीका करणारे ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे. तसेच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही योगींवर निशाणा साधला आहे.

योगींचा काँग्रेसवरही वार
‘काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. ते रामावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा अवमान करून माफियांचे संरक्षण करत आहे. याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे असे योगी म्हणाले.

कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद केले
या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विरोधात युपीने लढा देत विजय मिळवल्याचा दावा केला. ‘देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे’ असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :