आबांच्या मुलीचं लग्न,अजित पवारांकडून पाहुण्यांचे स्वागत, सुप्रिया सुळेंनी वाटल्या अक्षता

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले. तर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे) भावंडांचे अगत्य पाहून सर्वजण भारावून गेले होते.

आबांच्याच ओढीनं अनेक कार्यकर्ते या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अजित पवार आणि सुप्रिया ताईंनी. लग्नाच्या दोन तास आधीच अजित पवार लग्न मंडपात हजर झाले होते. अजित दादांनी आवर्जुन सगळं व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा केली आणि खुद्द वऱ्हाडी मंडळींच स्वागत करायला दारावर उभे झाले.

लग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.