fbpx

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच येडियुरप्पांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

yeddyurappa_

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीये. त्यांनी शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करतच भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी त्यांना संधी देताच, येडियुरप्पांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. आता पुढच्या १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. अर्थातच, हा भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.

परंतु, येडियुरप्पांना सत्तास्थापनेबाबत पूर्ण विश्वास आहे. आपलं सरकार पाच वर्षं पूर्ण करेल, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय. हे सांगतानाच, त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही मांडली. आपलं सरकार शेतकऱ्यांचं १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करेल, असं त्यांनी जाहीर केलंय. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची औपचारिक घोषणाही ते करणार आहेत.