भाजपच्या नेत्यांची-कार्यकर्त्यांची दाढी-कटिंग करायची नाही: नाभिक संघटना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाची माफी मागावी-संजय नक्षणे

टीम महाराष्ट्र देशा – जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाभिक समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची कटिंग आणि दाढी करायची नाही, असा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडमधील कार्यक्रमात नाभिक समाजाविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

ज्या प्रकारे एक न्हावी तीन- चार ग्राहक असतील तर प्रत्येकाची अर्धी-अर्धी हजामत करतात तशाप्रकारे काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला मलाई देऊन कामं अर्धवट ठेवली होती, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वी दौंडमधील पाटस येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले होते .

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर नाभिक संघटना नाराज झाल्या असून, मंगळवारी यवतमाळमधील नाभिक संघटनेने थेट भाजपलाच इशारा दिला. भाजपचे मंत्री, आमदार, कार्यकर्ते आणि नेत्यांची दाढी व कटिंग करायची नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नक्षणे यांनी दिली. नाभिक समाज हा प्रामाणिकपणे काम करुन उदरनिर्वाह करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अन्य भागांमध्येही नाभिक समाजाने आंदोलन केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी नाभिक समाजाची मागणी आहे.

You might also like
Comments
Loading...