यशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार !

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ लेखक यशवंतराव गडाख व प्रसिद्ध व्याख्याते-विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांना यंदाचा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदा तिसावे वर्ष असून, पाच हजार रुपये रोख, सत्यशोधक फेटा, प्रबोधन लेखणी, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्या वतीने पुढील महिन्यात भोसरी येथे होत असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यशवंतराव गडाख हे एक वैचारिक लेखन करणारे, तसेच साहित्यासह राजकारण आणि समाजकारणात अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तर प्रा. तेज निवळीकर संत गाडगेबाबा यांचा विचार पुढे घेऊन जाण्यात अग्रणी आहेत. त्याचबरोबर उत्तम व्याख्याते आणि विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. या दोन्ही मान्यवर साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल यंदाचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय बंधुता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे व संमेलनाचे मुख्य संयोजक प्रा. अशोक पगारिया यांनी कळवले आहे.