…तर पालकमंत्री राम शिंदेंंना बांगड्यांचा आहेर देणार : यशवंत सेना महिला आघाडी

Ram-Shinde-

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- भाजपा सरकारने महाराष्ट्र राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी २०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप चार वर्षात या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्याचाच उद्रेक धनगर समाजाकडून ३१ मे रोजी चौंडीत अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात झाला. पण तेथे गोंधळ घालणारे राष्ट्रवादीचे होते की भाजपचेच होते, हे स्पष्ट होत नसले तरी पोलिसांनी मात्र खोटे गुन्हे दाखल करून निरपराधांना यात अडकवले आहे. अहिल्यादेवी जयंतीदिनी चौंडीत झालेल्या दगडफेक व गोंधळ प्रकरणी ५५ जणांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी रविवारी येथे केला. ‘हे गुन्हे दहा दिवसात मागे घेतले नाही तर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना यशवंत सेनेची महिला आघाडी बांगड्यांचा आहेर देईल’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘सत्तेत येण्यासाठी धनगर आरक्षणाचे आश्वासन देणारे भाजप सरकार आता आश्वासन पूर्ती करीत नसल्याने आरक्षण मागणीचा लढा यापुढे यशवंत सेनेच्या नेतृत्वाखाली होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात समाजाचे प्रभावी संघटन उभे करणार आहे व येत्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवणार आहे’, असे सांगून गडदे म्हणाले, ‘पालकमंत्री प्रा. शिंदे पूर्वग्रहदूषित वागत आहेत. फोनवरही चर्चा करण्यासाठी ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे येत्या २० जूनपर्यंत चौंडीतील गोंधळाचे गुन्हे मागे घेतले नाही तर त्यांना महिला आघाडीकडून बांगड्यांचा आहेर दिला जाणार आहे’, असेही गडदे यांनी स्पष्ट केले.