पोलिसांवर हात उचलणाऱ्या यशोमती ठाकूर म्हणाल्या,’शेवटी सत्याचाच विजय होईल’

yashomati thakur

अमरावती : कॉंग्रेस नेत्या व उद्धव ठाकरे सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना ही शिक्षा झाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबलवर हात उचलणे यशोमती ठाकूर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तसेच अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि रुपये १५ हजार दंड आकारण्यात आला आहे.सोबतच त्यांचा कार चालक आणि दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

दरम्यान,’सामना’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. मी स्वतः वकील आहे. न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणे योग्य नाही. पण आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. शेवटी सत्याचाच विजय होईल अशी प्रतिक्रीया अॅड. यशोमती ठाकूर यांनी यावर व्यक्त केली.

दरम्यान,यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.पोलिसांवर हात उचलताना यशोमतीताईंवर कुठले संस्कार होते आणि तेव्हा संविधानाचे त्यांना स्मरण झाले नाही का, असा प्रश्नही शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

हा सामूहिक गुंडगिरीचा प्रकार आहे. पोलिसांवर हात उचलण्याचा आरोप सिद्ध झालेल्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा व आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून कर्तव्यदक्ष पोलीसास न्याय मिळाला आहे. सत्तेची नशा कशी असते, याचे व नशा काशी उतरते याचेही हे बोलके उदाहरण असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:-