fbpx

Yahoo- याहू मेलची प्रिमीयम सेवा

अत्यंत आकर्षक अशा डिझाईनने सज्ज असणारे याहू मेल युजर्ससाठी सादर करण्यात आले असून यासोबत याहू मेल प्रो या नावाने प्रिमीयम सेवादेखील सुरू करण्यात आली आहे.

डेस्कटॉप युजर्ससाठी याहू मेलचे अपडेट सादर करण्यात आले आहे. याच या सेवेचा अक्षरश: कायापालट झाल्याचे दिसून येत आहे. यात आता जी-मेलप्रमाणे विविध आकर्षक थीम्सचा वापर करता येणार आहे. याशिवाय यात तीन ले-आऊटच्या मदतीने युजरला हव्या त्या पध्दतीने वापरता येईल. तसेच युजर्सला आता इमोजींचा वापर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. याशिवाय आता इमेलच्या अटॅचमेंटमध्ये असणारे फोटो आणि डॉक्युमेंटला तात्काळ पाहण्यासाठी स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. यासोबत सर्च करण्याची सुविधाही सुधारण्यात आली आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे याहू मेलवर आता याहू मेल प्रो या नावाने प्रिमीयम सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा घेणार्‍यांना अ‍ॅड-फ्री अर्थात जाहिरात विरहीत ई-मेल सेवेचा लाभ मिळेल. यासाठी ३.५ डॉलर्स प्रति-महिना इतकी आकारणी करण्यात येईल. तर कुणाला ही सेवा फक्त स्मार्टफोनसाठी हवी असल्यास एक डॉलर्स प्रति-महिना इतकी आकारणी करण्यात येणार आहे.

याहू मेल दोन दशकांइतके जुने असून अद्यापही ही जगात तिसर्‍या क्रमांकाची ई-मेल सेवा आहे. याहू समूहाला अलीकडच्या काळात बर्‍याच अडचणी आल्या तरी याहू मेल आपली लोकप्रियता टिकवून आहे. नुकतेच याहूला व्हेरिझॉन कंपनीने अधिग्रहीत केले आहे. या पार्श्‍वभूमिवर याहू मेलचा कायापालट करण्यात आला असल्याचे मानले जात आहे.

पहा:- याहू मेलच्या नवीन फिचर्सची माहिती देणारा व्हिडीओ.