MI 6- शाओमीचा MI6 स्मार्टफोन सज्ज

शाओमीने सहा जीबी रॅम, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर व तीन कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणार्‍या MI 6 या स्मार्टफोनचे आज अनावरण केले आहे.

 

बीजींग शहरातील एका शानदार कार्यक्रमात शाओमीने हे मॉडेल जगासमोर पहिल्यांदा प्रदर्शीत केले. गत वर्षी लाँच करण्यात आलेल्या ‘MI 5’ या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे. हे मॉडेल सहा जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज तसेच सहा जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आल्या.याची किंमत २३,४३५ आणि २७,१७२ रूपये इतकि आहे. यात चारही बाजूंनी ३-डी ग्लास डिझाईन देण्यात आली असून याची फ्रेम स्टीलची आहे. यात ५.१५ इंच आकारमानाचा आणि १२०० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे.

 

६४ बीट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. यातील बॅटरी ३३५० मिलीअँपिअर प्रति तास इतक्या क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन तब्बल एक दिवसापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

शाओमी मी ६ या मॉडेलच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा हा वाईड अँगल लेन्स व ४-अॅक्सीस ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा तर दुसरा टेलिफोटो लेन्सयुक्त १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट तसेच २.२ ड्युअल वाय-फाय तंत्रज्ञान देण्यात आले आहे. याशिवाय यात ड्युअल सीम, ड्युअल स्पीकर्स, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, युएसबी टाईप-सी आदी फिचर्स असतील. मात्र लक्षणीय बाब म्हणजे यात आयफोनप्रमाणे हेडफोन जॅक देण्यात आलेले नाही. हे मॉडेल भारतात नेमके केव्हा सादर होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, येत्या दोन-तीन महिन्यात मी ६ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना खरेदी करता येईल असे मानले जात आहे.