लेखक, विचारवंत असुरक्षित असल्यावरून उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

मुंबई : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन होत आहे. देशातील लेखक, विचारवंत भीतीच्या छायेत आहेत. जर आपण आपले मत व्यक्त केले, तर आपल्यावरही हल्ला होऊ शकतो, अशी भीती या विचारवंतांना वाटते. त्यामुळे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत असल्याची चिंता मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्त केली.

नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. समाजातील काही घटकांना पटत नाही म्हणून लोकांनी त्यांची मते मांडायची नाहीत का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

पद्मावती चित्रपय प्रदर्शित होत नसल्याच्या वादावरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणी तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिका-यांनी संयुक्त बैठका घेऊन ठोस कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने या वेळी दिले. पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.