पैलवान राहुल आवारे होणार डीवायएसपी ,समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा

aaware rahul 1

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याला शासकीय सेवेत रुजू करुन घेणार असल्याची माहिती राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्यामुळे राहुल आवारे आता डीवायएसपी होणार हे निश्चित झाले आहे.राहुल आवारे याला शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की केले आहे, अशी माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारेचा आज पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप कांबळे बोलत होते.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बीडचा सुपूत्र कुस्तीपटू राहूल आवारे याची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली होती.राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

गोल्डकोस्ट येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या राहुल आवारेने कुस्तीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली .५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करत राहुलने या स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.शेवटच्या फेरीत स्टिव्हन ताकाहाशीने राहुलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने स्टिव्हन ताकाहाशीचा डाव त्याच्यावरच उलटवत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.