fbpx

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कांस्यपदकाचा लिलाव

सातारा : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या क्रीडासंकुलाच्या उभारणीमध्ये होणारा विलंब तसेच शासनाकडून दाखवण्यात येणारी उदासीनता याचा निषेध म्हणून ऑलम्पिक स्पर्धेत जे कांस्यपदक खाशाबा जाधवांनी मिळवलं होतं त्याचाच लिलाव करण्याचा निर्णय जाधव यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आयुष्यभर संघर्ष करीत असतो. हे पदक केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर त्याच्या देशाकरिताही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असते. मात्र आपल्या देशात पदक विजेत्यांची उपेक्षाच होत असते. त्याचा अभिनव पद्धतीने निषेध करण्यासाठी ऑलिम्पिक कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या कुटुंबीयांनी या पदकाचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.

काय म्हणणं आहे जाधव कुटुंबियांचे

जळगाव येथे २००९ मध्ये खाशाबा जाधव करंडक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी तत्कालीन क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी खाशाबांचे जन्मगावी राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल बांधण्याचे व तेथे अद्ययावत सुविधांनी युक्त अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली. या संकुलासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे आमच्या कुटुंबीयांनी कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील २२ गुंठे जागा दिली. सुरुवातीला ही जागा अयोग्य असल्याची टीका करण्यात आली. मात्र नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ही जागा योग्य असल्याची शिफारस केली. २०१३ मध्ये या संकुलासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र एवढय़ा कमी खर्चात क्रीडा संकुल उभारणे शक्य नसल्यामुळे शासनाने काढलेल्या टेंडर नोटीसला प्रतिसाद आला नाही. त्यामुळे निधी मिळूनही हे संकुल अद्याप उभे राहिलेले नाही. संकुलासाठी अतिरिक्त निधी आम्ही खाशाबांचे पदक विकून उभारण्याचे ठरवले आहे. जर शासनाला हे संकुल उभे करावयाचे नसेल तर त्यांनी आमची जागा परत करावी – रणजीत जाधव – खाशाबा यांचे पुत्र