तुम्ही केंद्र सरकारलाही देशविरोधी म्हणाल का?-रघुराम राजन

raghuram rajan

नवी-दिल्ली : भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘इन्फोसिस’ कंपनीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया देत थेट सवालही केला आहे. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकातून करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती. यासंदर्भात बोलत असतांना राजन यांनी ‘कोरोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का?’असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

मंगळवारी(१४ सप्टें.)एका मुलाखतीमध्ये बोलत असतांना ते म्हणाले की,’हे वक्तव्य काहीच कामाचे नाही आहे असे मला वाटते. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं काम न करणाऱ्या सरकारला तुम्ही दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्यांना चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात.’ तसेच ‘जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मला फार योग्य वाटला नाही. ते अजून चांगल्या पद्धतीने करता आले असते. परंतु या चुकांमधून शिकायला हवं. त्यांचा वापर तुमचे जुने हेवे दावे काढण्यासाठी होता कामा नये’ असेही राजन म्हणाले.

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या आत्ताच्या अंकात करण्यात आला आहे. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीका देखील या लेखात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या