fbpx

चंद्रकांत दादा हे घ्या खड्डे. . आता आमचे बक्षीस रोख देता कि कार्डने!

barshi kurduwadi road

राज्यातील पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर १५ डिसेंबर २०१६ नंतर खड्डे दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनुसार, आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीकरांना लाखो रुपये बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. बार्शी-कुर्डूवाडी रस्ता हा संपूर्ण राज्यात खड्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे. बार्शी ते कुर्डूवाडी हे ३४ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागतो. गेली अनेक वर्षे हा त्रास सहन करणाऱ्या बार्शी तसेच परिसरातील नागरिकांनी अखेर एक जनआंदोलन पुकारले आहे. यानुसार रविवारी सकाळी या रस्त्यावरील खड्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यावेळी एक-दोन नाही तर हजारो छोटे मोठे खड्डे सापडले . काही खड्डे तर एवढे मोठे आहेत कि एखादी व्यक्ती त्यात आरामात समाधी घेऊ शकेल.

बांधकामंत्र्यांनी जनतेला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपून वर्ष उलटले आणि खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा हवेतच विरली, या रस्त्या संदर्भात सुस्तावलेल्या बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदने देवूनही अद्याप प्रशासन झोपलेले असल्याने वाहनचालकांची परवड सुरूच आहे. बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यानच्या रस्त्यावरून डांबरी रस्ताच जणू गायब झाला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून बार्शीमधील सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येत खड्डेमुक्त बार्शी-कुर्डूवाडी रस्ता करण्यासाठी जनआंदोलन उभारले आहे. त्यासाठी सोशल मिडीयाचा देखील प्रभावी वापर करण्यात येत आहे. आज या आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला असून संपूर्ण रस्त्यावरील खड्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

पंचनामे. अर्ज. निवेदने. ठिय्या आंदोलन. रस्ता रोको अशा प्रकराची आंदोलने यापुढे करण्यात येणार आहेत.