चिंताजनक! महापालिकेतील ‘पॉझिटिव्हीटी’ वाढली

औरंगाबाद : जसजसा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसतसे सामान्य नागरिकांबरोबरच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या पंधरा दिवसात महापालिकेतील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फ्रंटलाईन वॉरियर्सचे लसीकरण सुरू केले जात आहे.

२ दिवसांपूर्वी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तत्पूर्वी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम हे देखील पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसेच आयुक्तांच्या दालनातील एक कर्मचारी आणि अग्निशन विभागातील तीन कर्मचारी देखील मंगळवारी पॉझिटिव्ह निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.

फ्रंटलाईन वर्करसाठी लसीकरण सुरू

केंद्र सरकाने ४५ वर्षावरील व्यक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी बंद केली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून ही नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारपासून आरोग्य सेवेत काम करणारे व फ्रंटलाईन वर्कर्स हे लसीसाठी नोंदणी करू शकतात, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी मंगळवारी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या