fbpx

#WorldTBDay: २०२५ पर्यंत भारत टीबी मुक्त करण्याचे लक्ष्य

टीम महाराष्ट्र देशा : १८८२ साली टीबी (क्षयरोग) च्या जीवाणूंचा शोध लावणाऱ्या डॉ. रॉबर्ट कोच यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे सरकारचे ध्येय आहे. देशपातळीवर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये टीबी ग्रस्त रुग्णांना शोधून व योग्य ते उपचार देऊन लवकरात लवकर तो कसा बरा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच नागरिकांमध्ये टीबी आणि त्यावरील उपाय यांची माहिती दिली जाते.

काय आहेत टीबी ची लक्षणं ?
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, खोकताना किंवा थुंकीवाटे रक्त पडणे, रात्री ताप येणे, भूक कमी लागणे, झटकन वजन कमी होणे, छातीत दुखणे, अशक्तपणा व थकवा जाणवणे, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होणे.

क्षयरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरकोलोसिस’ या अतिसूक्ष्म जंतुमुळे होतो. हे जंतू वातावरणातील हवेत असतात व श्वसनाद्वारे फुफ्फुसामध्ये ओढले जाऊन शरीरात संसर्ग होतो. हा रोग हवेतून पसरत असल्याने याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

कशी घ्याल काळजी ?
तोंड झाकून खोकणे किंवा शिंकणे, वरील लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रुग्णालयात जावून स्वत:ला तपासणी करून घेणे, योग्य तो संतुलित आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल बांधणे.

क्षयरोगाची तपासणी होऊन नियमित औषधोपचार घेतल्यास हा रोग बरा होतो त्यामळे वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास त्याचे मुळापासून निर्मुलन करता येऊ शकते.