जगातील पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर

bashweshwar

१२ शतकामध्ये रूढी परंपरा, कर्मकांड, जातीमधील भेदभाव, स्त्री दास्यत्व अशा वेगवेगळ्या गोष्टींनी भारतीय समाजाला पिळवटून टाकले होते, अशा परिस्थितीमध्ये हे सर्व बदलण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेले महापुरुष म्हणजे जगतज्योती आद्यक्रांतिवीर महात्मा बसवेश्वर. वेळी आपल्या जीवपणाला लावून भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावण्याचे धाडस महात्मा बसवेश्वर यांनीच दाखवले. यामुळे त्यांना अनेकजण विद्रोही समाजसुधारक देखील म्हणतात.

Loading...

एका बाजूला कर्मकांडाने समाज पोखरला जात असताना काय कवे कैलास म्हणजेच श्रम हेच दैवत्व आहे, दगडामध्ये देव नाही तर तो तुमच्या श्रमात असल्याचा महात्मा बसवेश्वर यांचा उपदेश जगाला नवीन दिशा देणारा ठरला, त्यामुळे कोणतेही कार्य हीन दर्जाचे नसल्याचा विचार समाजमनात बिंबवला गेला. स्त्रीला केवळ उपभोगाचे साधन, शुद्र समजणाऱ्या प्रवृत्तींवर बसवन्नांनी कठोर प्रहार केला. चूल आणि मुलच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रियांना समान दर्जा देण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांचा रोष देखील पत्करला. स्त्रियांना धार्मिक आध्यात्मिक हक्क देण्याच काम महात्मा बसवेश्वर यांनीच केले.

लोकशाहीतील पहिली संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुभव मंटपाची स्थापना करत बसवन्नांनी जातीच्या भिंती तोडत समता बंधुता आणि वैज्ञानीक दृष्टीकोन असणाऱ्या लिंगायत धर्माची स्थापना केली.

अनुभव मंटप
कल्याण म्हणजेच आत्ताचे बसवकल्याण नगरीमध्ये लिंगायत धर्माची बीजे रोवली जात असताना धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतून अनुभव मंटपाची स्थापना करण्यात आली. याच अनुभव मंटपाची निर्मित असणारे ‘वचन साहित्य’ हे लिंगायतांचा धर्म ग्रंथ मानले जाते. महान तत्त्वज्ञानी अल्लमदेव प्रभू हे या मंटपाचे अध्यक्ष होते. मंटपामध्ये योग्य पारख करूनच सभासद म्हणून बसण्याचा मान दिला जाई.

महात्मा बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गानुसार कोणत्याही जाती धर्माचे व्यक्ती या मंटपाचे सभासद असत, यातील काही प्रमुख नाव म्हणजे शिवनाग मय्या ( महार ) शंकर दासीमय्या ( शिंपी) मडीवाळ माचीदेव ( धोबी ) मेदार केतय्या ( बरूड ) मादर चन्नय्या ( मांग ) किन्नरी बोमय्या ( सोनार ) समगार हरळय्या ( चांभार ) चन्नबसवेश्वर ( ब्राम्हण ) ( ही नावे केवळ प्रातिनिधिक स्वरुपात दिली आहेत). अनुभव मंटपामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे तब्बल ७७० शरण होते, बसवेश्वरांनी स्थापिलेल्या लिंगायत धर्माची सुरुवातच स्त्री-पुरुषांमधील भेदाभेद संपवण्यापासून झाल्याने शरणांच्या बरोबरीने महिलांनादेखील अनुभव मंटपात समान दर्जा देण्यात आला होता, मंटपामध्ये महिलांची संख्या साठ होती त्यातील तीस महिलांनी वचने लिहिली आहेत.

काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे विचारवंत ज्यांना समाजातील जातीय भेद, कर्मकांड, स्त्री-पुरुषांमधील भेदाभेद मान्य नव्हता ,जे समाजामध्ये सामनातावादी धर्माची निर्मिती करू इच्छित होते ते लोक अनुभव मंटपामध्ये चर्चेसाठी येत असत, मंटपामध्ये असणारे वातावरण पाहून बहुतांश बुद्धिवंत त्याचे सभासद झाले. यातूनच एकमेकांचे चांगले वाईट अनुभव चर्चिले जाई. वाईट ते सोडावे आणि चांगले घ्यावे याप्रमाणे समाजसुधारणेसाठी असणारे विचार ‘वचन’ स्वरुपात लिहिले जात होते. महात्मा बसवेश्वर यांनी मूर्ती पूजेला कडाडून विरोध केला होता, हा विरोध करताना ते म्हणतात

‘लाखांनी घडली मूर्ती ती पतळे, देवत्व कैसे अग्नीत वितळे,
गरजेनुसार जे जाती विकले, सांगा त्यांना का देव मानू?’

१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरते, त्यांनी श्रमाला दिलेले महत्व कार्याच्या महानतेची शिकवण देते. आपल्या वचन साहित्याद्वारे त्यांनी विश्वकल्याणासाठी सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली होती सामान्य माणसाच्या अंत:करणात समतेचा स्फुल्लिंग चेतवला होता. म्हणूनच ख-या अर्थाने बसवेश्वर रूढी परंपरा, कर्मकांड, जातीमधील भेदभाव, स्त्री दास्यत्वा विरुद्ध पेटून उठणारे विद्रोही ठरतात. विद्रोही महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!Loading…


Loading…

Loading...