९ वर्षीय जुळ्या भावंडांचा जागतिक विक्रम

पुणे : जैन धर्माच्या अवघ्या नऊ वर्षाच्या दोन शतावधानी बालमुनींनी केवळ अडीच तासात प्राकृत भाषेच्या पाक्षिक सूत्र ग्रंथातील ३५० श्लोक कंठस्थ करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नामीचंद्रसागर म. सा. व नेमीचंद्रसागर म. सा. असे या शतावधानी बालमुनींची नावे आहेत. सोमवार पेठेतील श्री राजस्थानी जैन श्वेतांबर संघ (पूर्व विभाग) येथे गुरुवारी हा कार्यक्रम झाला. इतक्या कमी वेळात एका अनुष्ट्य छंदात ३२ अक्षरे असलेले श्लोक तोंडपाठ केल्याचे कुठेही ऐकिवात नाही.

हे दोघे भाऊ सागर समुदायाचे आचार्य नयनचंद्रसागर म. सा. यांचे शिष्य युवाशतावधानी अभिनंदनचंद्रसागर म. सा. यांचे शिष्य आहेत. पाक्षिकसूत्रामध्ये आपल्या हातून घडलेल्या पापांचे पश्चाताप कारण्याबाबतचे वर्णन असून, साधू महात्म्यांसाठी एकप्रकारे संविधान ग्रंथ आहे. या जुळ्या चेहऱ्याच्या निरागस बालमुनींना पाच प्रतिक्रमण, नवस्मरण, चार प्रकरण, तीन भाष्य, कर्मग्रन्थ, पंचसूत्र यासह दशवाईकालिक व इतर असे २००० होऊन अधिक श्लोक कंठस्थ आहेत. तसेच भगवदगीता व कुराणाचाही काही भाग तोंडपाठ आहे. या दोन्ही बालमुनींनी सर्व धर्माचे ग्रंथ कंठस्थ करविण्याची त्यांचे गुरु अभिनंदनचंद्रसागर यांना इच्छा आहे.आजच्या शतावधानावेळी हिंदी, मराठी, पंजाबी व कन्नड सिनेमांत काम करणारे अभिनेते राणा विक्रमसिंह व अनिल जैन अभिनंदनचंद्रसागर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यावेळी राणा विक्रमसिंह यांनीही या दोन्ही बालमुनींचे कौतुक केले. श्रीसंघाचे अध्यक्ष बाबुलालजी सोळंकी, प्रकाश बाफना, सागर परिवाराचे अध्यक्ष रमेशभाई ओसवाल, गोडवाड संघाचे सचिव गणपतजी मेहता यावेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षी गुजरातेतील सुरतमध्ये शतावधानाचा म्हणजेच एकावेळी शंभर वेगवेगळी नावे किंवा गोष्टी लक्षात ठेवण्याचा व त्या पुन्हा उलटसुलट किंवा अधल्यामध्यल्या क्रमाने म्हणून दाखविण्याचा प्रयोग केला गेला. त्यामध्येही या दोघांनी ही सिद्धी प्राप्त केली होती. गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रकही देण्यात आले होते.