लसीकरणाचा विश्वविक्रम; एकाच दिवसात तब्बल अडीच कोटींहून अधिक डोस वितरित

मोदी

नवी दिल्ली-  शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या या कामगिरीविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशांमध्ये काढले आहेत. लसीकरणाची ही मोहिम यशस्वी करणाऱ्या डॉक्टर, संशोधक, व्यवस्थापक, परिचारक तसंच आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसंच प्रत्येकानं कोविड-19 आजाराला हरवण्यासाठी लसीकरणाला पाठबळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं.

सेवा और समर्पण अभियानात सहभागी सक्रीय भाजपच्या कार्यकर्त्यांचं कौतुकही केलं. लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा अभिमान वाटत असल्याचेही मोदी म्हणाले. दरम्यान, काल वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आणि समाजसेवेचे उपक्रम राबविणारे लोक आणि संघटनांचे त्यांनी आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या