जागतिक आरोग्य दिन विशेष : कोरोना फोबियाचा आघात, मानसिक आरोग्याची वाताहत!

औरंगाबाद : गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत आपल्या आयुष्यावर असंख्य निर्बंध आले आहेत. आत्ताशा कुठे नवीन सुरुवात करणार तर पुन्हा एकदा कोरोनाने पूर्वरुप धारण केले. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अंधाराने आपले जीवन व्यापून टाकले. कुठलाही विरंगुळा नाही, आलेली मरगळ, उदासिनता, आर्थिक अडचणी यांमुळे आज अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. त्यातच कोरोनाफोबिया नामक मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या जागतिक आरोग्य दिनी शरीराबरोबरच मनाचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करुया. असे आवाहन मनोविकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटणकर यांनी केले आहे.

दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या या काळात आपले आरोग्य हिच धनसंपत्ती आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र शरीर स्वास्थ्याबरोबरच मनाचे आरोग्यही तितकेच उत्तम असणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, गतवर्षी कोरोना आला अन कधीही न थांबणारी शहरे शांत झाली. अतिशय व्यस्त जीवनशैलीमधुन माणूस अचानकपणे रिकामा झाला. त्यावेळी प्रत्येकासमोर पर्याय होता तो म्हणजे मोबाईल फोन. फेसबुक , व्हॉटसअॅप, ट्विटर तर होतेच. त्यावेळी दिवसातला जास्तीत जास्त वेळ यांवर जाऊ लागला त्यामुळे लॉकडाऊन काळात ताणतणाव, नैराश्य वाढीस लागले. मुख्यत्वेकरुन तरुणाईवर याचा मोठा परिणाम झाला. रोजगार बुडाले. कामधंदा नसल्याने आर्थिकदृष्ट्या माणसाचे आयुष्य अस्थिर झाले.

काही काळानंतर परिस्थिती बदलत गेली. पूर्वीचे चैतन्य परतू लागले असे वाटत असतांनाच पुन्हा एकदा या विषाणूने आपल्या आयुष्यात प्रवेश केला. अनेकांना कोरोनाफोबिया होत आहे. हि वेळही जाणारच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक नव्या संधी येतीलच. त्या संधीचे सोने करा. नकारात्मक बातम्या आणि माणसे दोहोंपासून दूर राहा. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे ताज्या दमाने आणि त्याच उत्साहाने स्वागत करा. असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या