fbpx

वर्ल्ड कप २०१९ : टीम इंडिया आज बांग्लादेशशी भिडणार

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना बांग्लादेशशी होणार आहे. मागच्या सामन्यात झालेला पराभव विसरून टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करणार आहे. भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता प्रेक्षक टीम इंडियाला या सामन्यासाठी फेव्हरेट मानत आहेत.

आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडियाचे सेमीफायनलमधील स्थान पक्के होणार आहे. तर बांगलादेशला उपांत्य फेरीसाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. गेल्या सामन्यात भारताला यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल कमी असेल. याचाच फायदा घेण्याचा बांग्लादेश प्रयत्न करणार आहे.

या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. केदार जाधव आणि युजवेंद्र चहलची कामगिरी निराशजनक आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जडेजा आणि दिनेश कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघासमोर क्रिकेटविश्वातील अव्वल अष्टपैलू शाकिब अल हसन याला रोखण्याचे आव्हान असणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत एकहाती सामना फिरवू शकतो. त्याच्यासह मुशफिकर रहीम, लिटन दास यांच्यावरही भारतीय गोलंदाजांना लगाम लावावा लागणार आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतग्रस्त विजय शंकर हा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकच्या मयंक अग्रवालला संघात स्थान मिळाले आहे.