शासकीय योजनांबाबत उद्या रत्नागिरीत कार्यशाळा

रत्नागिरी : शासकीय योजनांची माहिती नीट मिळत नाही, मिळाली तर त्याची अंमलबजावणी कशी करायची ते समजत नाही. अनेकदा विविध सरकारी कामात अडचणी येतात. माहितीअभावी किंवा तांत्रिक कारणांमुळे काम पूर्ण होण्यास विलंब होतो. यासारख्या विविध समस्या सर्वत्र अनुभवायला येतात. याच पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, सेवा हमी कायदा तसेच माहितीचा अधिकार कायदा या जनहितार्थ केलेल्या कायद्यातील उपयुक्त माहितीबाबत उद्या (दि. ३ नोव्हेंबर) येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सरकारी किंवा प्रशासकीय कामात समस्या आल्यास त्या दूर करण्यासाठी कोणताही चुकीच्या मार्गाचा मोह न करताही आपण योग्य मार्गाचा वापर केला तर समस्यांचा निवारण करणे शक्य आहे. या दृष्टीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्ताने पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि जनजागृती संघाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, सेवा हमी कायदा तसेच माहितीचा अधिकार कायदा अशा कायद्यांतील उपयुक्त माहितीबाबत मार्गदर्शन होणार आहे. ही कार्यशाळा उद्या सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनजागृती संघाने केले आहे.