लाखो रुपये घेतल्याशिवाय इथे कामे होत नाहीत; संतापलेल्या डॉक्टरचा औरंगाबाद ‘मनपा’वर आरोप!

amc

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट कारभार सोमवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवीन हॉस्पिटलच्या परवानगीसाठी एका डॉक्टरने महापालिकेकडे फाईल दाखल केली. मात्र, वर्ष झाले तरी त्यास ही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्रस्त डॉक्टरने सोमवारी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच आपला संताप व्यक्त केला. तीन तीन लाख रुपये घेतल्याशिवाय इथे परवानगी मिळत नाही. मी पैसे देत नाही म्हणूनच माझी फाईल दाबून धरली असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी या प्रकरणी लगेचच दोघा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. कान, नाक, घसा तज्ञ डॉ. सुनील पत्की हे सध्या हडको भागात हॉस्पिटल चालवितात. त्यांना सिडको एन- २ येथे नवीन हॉस्पिटल सुरू करायचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी गरजेची असल्याने डॉ. पत्की यांनी डिसेंबर २०२० रोजी आपली फाईल दाखल केली. त्यांनी सर्व कागदपत्रे, शुल्क याची पूर्तता केली. नियमानुसार पंधरा दिवसांत ही परवागनी मिळणे गरजेचे होते.

मात्र, आतापर्यंत त्यांना ही परवानगी मिळाली नाही. कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी सोमवारी मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी संबंधित लिपिक प्रवीण रांजणकर यांनी ही फाईल नगर विकास खात्याकडे पाठविली होती असे सांगत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. मंडलेचा यांचे समाधान झाले नाही.

त्यांनी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रेरणा संकलेचा आणि लिपिक रांजणकर यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. हॉस्पिटलच्या परवानगीची फाईल नगररचना विभागाकडे पाठविण्याची गरज काय अशी विचारणा यावेळी डॉ. पत्की यांनी केली. त्यावर हॉस्पिटल लिगल जागेत आहे की नाही हे तपासण्यासाठी फाईल पाठविली जाते, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. मात्र, मी बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र सोबत जोडले आहे, त्यामुळे ते लिगल जागेत आहे हे स्पष्ट होते. तरीही संचिका अडवून ठेवली गेली, असे डॉ. पत्की यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या