महापालिकेच्या दवाखान्यात अचानक अवतरले 150 बोगस रुग्ण

पुणे: पुणे महापालिकेच्या येरवडा भागात असणाऱ्या राजीव गांधी रुग्णालयात आज अचानक 150 च्या वर रुग्ण दाखल झाले होते. मात्र हे रुग्ण नसून पिंपरी चिंचवडच्या डी वाय पाटील कॉलेजचे कर्मचारी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी हा सर्व उघड केला आहे.

विशेष म्हणजे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील हा सर्व प्रकार काय आहे हे माहीत नाही. दरम्यान याबाबद्दल पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. तर महापालिकेकडून डी वाय पाटील महाविद्यालयाला नोटीस पाठवण्यात येणार असून नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका सह आरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी सांगितले.

या विषयी बोलताना नगरसेवक अश्विनी लांडगे म्हणाल्या की ‘रोजच्या प्रमाणे हॉस्पिटलला भेट देण्यास गेल्यावर काल दवाखाना बंद होता. मात्र आज अचानक 150 च्यावर रुग्ण दवाखन्यात दाखल करण्यात आले. अधिकची चौकशी केली असता ते सर्व डी वाय पाटील हॉस्पिटलचे कर्मचारी असल्याचं समजले. मात्र कोणीही आजारी नसताना त्यांना सलाईन लावल्याचे दाखवण्यात आले होते. हा सर्व धक्कादायक प्रकार असून याची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र देणार आहे.