‘अवयवदाना’च्या माध्यमातून जीवनदान देण्याचे कार्य करावे- झगडे

mahesh zagade nashik

नाशिक : मृत्यूनंतर जगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गरजू रूग्णांना ‘अवयवदाना’च्या माध्यमातून जीवनदान देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या महाअवयवदान अभियान जनजागृती कार्यक्रमात झगडे बोलत होते. यावेळी सर्वश्री अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, पी. एन. मित्रगोत्री, सुखदेव बनकरप्रविण पुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त झगडे म्हणाले, अवयवदान ही संकल्पना काही वर्षांपासून अस्तित्वात असली तरी त्याबाबत जनजागृती झालेली नाही. आज वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अवयवदान करणे किंवा एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण करणे सुलभ झाले आहे. जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयवांमुळे गरजु व्यक्तिंना जीवनदान देता येते हे पुण्याचे काम आहे. त्यामुळे सर्वांनी अवयवदानाच्या या अभियानात सहभागी होऊन त्याची सर्वस्तरावर जनजागृती करावी, असे आवाहन ही यावेळी श्री. झगडे यांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी जिवंतपणी व मृत्यूनंतर कोणत्या अवयवांचे दान करता येते यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अवयवदान व देहदान या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे, अवयवदान हे जिवंतपणी व मरणानंतर जीवनदान देण्यासाठी करण्यात येते. तर ‘देहदान’ हे मृत्यूनंतरच वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या वैद्यकिय महाविद्यालयास मानवी शरीराचा अभ्यास करता यावा यासाठी केले जाते, असेही डॉ. जगदाळे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विभागीय आयुक्तांनी ‘अवयवदान’ करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शपथ दिली.