शेतकरी आणि सामान्य जनतेची कामे वेळेत करा – आमदार नमिता मुंदडा

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : मतदारसंघातील शेतकरी व सामान्य जनतेची कामे विनाविलंब व्हावीत, यासाठी तहसील कार्यालयात आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसील दुलाजी मेंडके, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, जिल्हा परिषद सदस्या डॉ. योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, भगवान केदार, सुरेंद्र तपसे व अशोक भोगजकर यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रशासनाच्या कामकाजासंबंधी असमाधान व्यक्त करत आमदार मुंदडा यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याच्या सूचना दिल्या. यापुढे काम घेऊन येणाऱ्या सामान्य जनतेची कामे प्राधान्यक्रम देऊन सोडविली पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन सातबारा दुरुस्ती वेळेत व्हावी, कर्मचारी व अधिकारी यांच्यात समन्वय साधावा, पंतप्रधान शेतकरी योजनेची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा, तलाठ्यांनी खासगी रायटर न ठेवता सजावर कामे करावीत, शेतकऱ्यांना कामासाठी अधिकची रक्कम आकारू नये, ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता, विकलांग व महिलांची कामे प्राधान्याने सोडवावीत. प्रलंबित अनेक कामे वेळेत न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कामानिमित्त आलेल्या सामान्य माणसाला अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. सेतू सेवा केंद्राकडून जनतेची आर्थिक लूट थांबविण्याचे आदेश दिले. कंत्राटदारांनी तत्काळ काम पूर्ण करावे, शेतीपंपाच्या वीजतारा ओढून घेणे, रोहित्र तत्काळ देऊन शेतकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. महावितरण आपल्या दारी यामधील प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे प्रशासन सुरळीत चालल्यास जनतेची कामे मार्गी लागतील. साहजिकच आपल्याला पुन्हा सूचना करण्याची गरज भासणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या