‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

पुणे: ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’ म्हणत पुण्यातील व्यापारी संघाने सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ करावी, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे व्यापारी महासंघ आणि हॉटेल व्यावसायिकांतर्फे शहर आणि उपनगरांत घंटानाद आंदोलन केले जात आहे. कोरोनामुळे पुणे भागात चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र आता सण- उत्सवाचा महिना असल्याने अतिरिक्त वेळ मिळावा यासाठी व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन केले जात आहे.

पुणे येथील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, गोखले रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, लष्कर परिसर, येरवडा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी एकत्र येत मंगळवारी दुपारच्या सुमारास घंटानाद आंदोलन केले. दुकानांना ७ वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी अन्यथा बुधवारपासून आम्ही दुकाने सात पर्यंत चालू ठेवणार असा इशारा व्यापारी संघाने सरकारला दिला आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, परमीट रूम उद्योग दीड वर्षांपासून बंद आहेत. हॉटेल सायंकाळी चार वाजता बंद करणे म्हणजे आमच्या उद्योगासाठी संपूर्ण शटडाउन आहे. असे मत व्यापारी संघाने व्यक्त केले आहे. सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी आता केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या