Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकामध्ये आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला आणि सलग सातवा विजय नोंदवला. या स्पर्धेत कांगारू संघ आतापर्यंत अपराजित आहे. बांगलादेशने प्रथम खेळताना ४३ षटकांत ६ बाद १३५ धावा केल्या. पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३२.१ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले. बेथ मुनी ६६ धावांवर नाबाद राहिली आणि सामनावीर ठरली. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील त्यांचे सर्व ७ सामने जिंकले. संघाने आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांना विजेतेपदासाठी फक्त २ सामने जिंकायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघही अंतिम-४ मध्ये पोहोचला आहे. इतर दोन संघ अजून ठरलेले नाहीत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. त्यांनी ८ षटकात बिनबाद ३३ धावा केल्या. मात्र, यानंतर संघ गडबडला आणि धावसंख्या ४ बाद ६२ धावा अशी झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार गोलंदाजी केली. बांगलादेशकडून लता मंडलने सर्वाधिक ३३ धावा केल्या. याशिवाय शर्मीन अख्तरने २४ धावा केल्या. ऍशले गार्डनर आणि जीन जोनासेनने २-२ विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी ४१ धावांत ४ विकेट गमावल्या. यानंतर बेथ मुनी आणि गार्डनर यांनी धावसंख्या ७० धावांपर्यंत नेली. त्यानंतर मुनी आणि अॅनाबेल सदरलँड यांनी नाबाद ६६ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. मुनीने ५ चौकारांसह ६६ धावा केल्या. दुसरीकडे सदरलँड २६ धावा करून नाबाद राहिली. सलमा खातूनने ३ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –