वर्ल्ड कपनंतर महिला क्रिकेटला अच्छे दिन

पुणे : इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे महिला क्रिकेटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. या एका वर्ल्डकपमुळे महिला क्रिकेटला खऱया अर्थाने अच्छे दिन आले असून, त्यामुळे आता सर्व क्रिकेट ऍकेडमी मुलींसाठीदेखील खुल्या झाल्या आहेत. आता बीसीसीआयने महिलांकरिताही आयपीएल स्पर्धा भरविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिने गुरूवारी येथे व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज स्मृती मानधना हिच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ती बोलत होती. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते.

स्मृती म्हणाली, मी पाच वर्षांची असताना भावासोबत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा माझा प्रवास खूप चांगला होता. वर्ल्डकप आधी एसीएल सर्जरीमुळे मी फिट नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्हच होते. परंतु, बीसीसीआयचे फिटनेस ट्रेनर आणि एनसीएने माझ्या फिटनेसकडे चांगले लक्ष दिले. त्यांच्यामुळेच मी या मोठय़ा आजारातून 5महिन्यात कमबॅक करून वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकले. वर्ल्डकपमुळे आमच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. क्रिकेटप्रेमी महिला क्रिकेटपटूंनाही ओळखू लागले आहेत. लोकांचा महिला क्रिकेटकडे बघण्याच्या दृष्टीकोन खूप बदलला आहे. खऱया अर्थाने महिला क्रिकेटसाठी आता अच्छे दिन आले आहेत. सर्व क्रिकेट क्लब आता महिलांसाठीदेखील खुल्या झाल्या आहेत. या आधी एखाद्या महिला खेळाडूला पुरूष खेळाडूची उपमा दिली जात होती. म्हणजे ही खेळाडू महिला संघातील सचिन वा सेहवाग अशा प्रकारे संबोधले जायचे. पण येथून पुढे महिला खेळाडूंना महिला खेळाडूंचीच उपमा मिळू शकते. ही संघाची मिताली राज वा झुलन गोस्वामी ही गोष्ट खूप मोठी आहे.

बीसीसीआयने महिलांचेदेखील आयपीएल सुरू करावे

या वर्ल्डकपमुळे मुलींचे क्रिकेट बघण्यास सुरूवात झाली आहे. मी माझा भाऊ आणि वडील यांच्यामुळेच क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले. माझा भाऊच माझा खरा आदर्श आहे. किंबहुना, श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कुमार संगकारा हा फलंदाजीतील माझा आयकॉन असून,ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनसारखे मला ऍग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचे आहे. टि-20 वर्ल्डकपला अजून बराच कालावधी आहे. पण या आधी आमचा पुढील कार्यक्रम बीसीसीआयकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. ज्याप्रमाणे पुरूषांची आयपीएल स्पर्धा आपल्याकडे दरवर्षी भरविली जाते. त्याप्रमाणे महिलांसाठी अशाप्रकारची आयपीएल स्पर्धा सुरू झाली, तर महिला क्रिकेटसाठी ती पर्वणीच ठरेल, असे मतही तिने नोंदविले.

खेळाची पॅशन असेल, तर हार्डवर्क करा

पहिल्या दोन सामन्यात माझ्याकडून चांगली कामगिरी झाल्यानंतर माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. त्यामुळे माझ्यावरील प्रेशर वाढले. याचा परिणाम खेळावर झाला, आणि नंतरच्या सामन्यांत कामगिरी खराब झाली. पण, खेळात या गोष्टी होत असतात. शेवटच्या सामन्यात आम्ही अटीतटीच्या वेळी थोडे गडबडलो. इंग्लंडचा संघ अनुभवी होता. पण तरी आम्ही चांगला खेळ केला. न्यूझीलंडवर विजय मिळविल्यावर आमचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. ऑस्ट्रेलियाविरोधात हरमित कौरने केलेली खेळी ही मी माझ्या जीवनात महिलांची पाहिलेली सर्वोकृष्ट खेळी आहे. खेळाची पॅशन असेल; तर हार्डवर्क करा नि ते एन्जॉय करा, असा सल्लाही स्मृतीने उदयोन्मुख महिला खेळाडूंना दिला.