‘स्त्रीला वय, पुरुषांना पगार आणि मोदींना प्रश्न विचारू नयेत’, काँग्रेसचा टोला

नरेंद्र मोदी

मुंबई : २०१४ पासून पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान ते एका पत्रकार परिषदेला हजर होते. मात्र, त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमित शाह यांनी दिली होती. त्यामुळे मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

संसदेत देखील पंतप्रधान मोदी क्वचितच खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाहायला मिळतात. त्यामुळे विरोधक मोदींवर सातत्याने निशाणा साधत असतात. काँग्रेस नेते तथा राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे मोदींना टोला लगावला आहे. ‘स्त्रीला तिचं वय विचारु नये, आणि पुरुषाला त्याचा पगार विचारु नये, असे सामाजिक संकेत आहेत. ‘मोदींना प्रश्न विचारु नयेत’ हा एक नवा संकेत आहे’ असी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपविरोधात विरोधी पक्षातील नेते एकवटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती.

या बैठकीत १४ पक्षांचे जवळपास १०० खासदार उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, नॅशनल कॉन्फरन्स, भाकप, माकप, राजद पक्षांच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या