fbpx

औरंगाबादेत पाण्याने त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय फोडलं

टीम महाराष्ट्र देशा : पाण्याअभावी त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत गाठून ग्रामपंचायत मधील फर्निचर, खुर्च्या रस्त्यावर फेकल्या असून ग्रामपंचायतीची तोडफोड केली आहे. औरंगाबाद मधील नागद येथील ही घटना आहे.

सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. काही ठिकाणी तब्बल २५ ते ३० दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. याचदरम्यान नागद ग्रुप ग्रामपंचायत पिण्याचे पाणी पुरविण्यास असमर्थ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी नागद येथील बसस्थानक भाग, मटवाडी, प्रेमनगर, सदाशिववाडी, आंबेडकरनगर, बजरंग चौक येथील नागरिकांसह महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, येथे सरपंच, उपसरपंचासह ग्रामविस्तार अधिकारी ग्रा.पं. सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. कोणीही जागेवर नसल्याने ग्रामस्थांचा संताप झाला.

महिलांसह नागरिकांनी सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांना फोन केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि महिलांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जात येथील फर्निचरसह खुर्च्या बाहेर फेकल्या तर टेबलची तोडफोडही केली. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.