देवीच्या गावात महिला उपेक्षित! नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव, पण पदावर पुरूष विराजमान

उस्मानाबाद : तुळजापूर हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. करोडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजाभवानीच्या गावातच महिलेले उपेक्षित वागणूक मिळत असल्याचे दिसतेय. तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव असताना प्रभारीच्या नावाखाली मागील चार वर्षांपासून नगराध्यक्षपद पुरुष नगरसेवक भूषवत आहे. ही कृती महिलांच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. तरी पुरूष नगराध्यक्षपद रद्द करून शासनाच्या नवीन आदेशानुसार नगराध्यक्षपदी महिला नगरसेविकेची निवड करा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, नगराध्यक्षपदाचे मुळ आरक्षण महिलेसाठी राखीव आहे. या पदावर महिलेचीच निवड होणे आवश्यक आहे. महराष्ट्र शासनाच्या दि. ९ ऑक्टोबर २०२० च्या शासन आदेशानुसार नगरसेवकांमधून महिला नगरसेविकेची नगराध्यक्षपदी निवड करायला हवी. निवेदनावर अमर मगर, सुनिल रोचकरी, राहुल खपले, आरती इंगळे या नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्यात.

दरम्यान, २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्चना गंगणे यांची नगराध्यक्षपदी थेट जनतेतून निवड झाली करण्यात आली होती. मात्र २०१८ मध्ये त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली.गंगणे यांनी त्यांच्या अपात्रतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. यावेळी न्यायालयाने सदर जागेची निवडणूक घेण्यास स्थगिती दिली असल्याने नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया रखडली असून अध्यक्षाचा पदभार उपाध्यक्षांकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या