पुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे किती महागात पडू शकते याचे धक्कदायक उदाहरण पुण्यात पहायला मिळत आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी फेसबुकवर मित्र बनलेल्याने श्रीमंत कुटुंबातील महिलेची हत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी आनंद निकम या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आनंद निकम हा भोसले नगर भागात चहा नाश्त्याचं छोटे हॉटेल चालवतो. त्याने फेसबुकच्या माध्यमातून ४२ वर्षीय महिलेशी मैत्री करत तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपी आणि मृत महिला मागील अनेक महिन्यापासून एकमेकांना भेटत होते. आरोपी आनंदच्या डोक्यावर दोन लाखांचे कर्ज होते. फेसबुकवर मैत्री झालेली महिला श्रीमंत घरातील असल्याचे त्याला माहीत होते.

महिलेचे दागिने चोरत कर्ज फेडण्याचा प्लॅन करून आरोपी फोटो काढण्याचा बहाण्याने तिला पुण्यापासून ७५ किमी असणाऱ्या ताम्हिणी घाटामध्ये घेवून गेला. तिकडे गेल्यावर आरोपी आनंद तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिचे हातपाय बांधले आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दागिने घेऊन पसार होण्यापूर्वी त्याने तिचा निर्घृण खून केला.

संबंधित महिला २२ जून रोजी मैत्रिणीसोबत शिर्डीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती दोन दिवसांनंतरही घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या मुलाने आई बेपत्ता असल्याची तक्रार मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी महिलेचे कॉल डीटेल्स तपासल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.