मांजरावरील वादातून महिलेचा खून

पुणे : घरात शिरलेले मांजर फेकून दिल्याने झालेल्या वादामध्ये एका महिलेला बेदम मारहाण करून खून झाल्याची घटना पुण्यातील म्हाळुंगेमध्ये घडली आहे . म्हाळुंगे येथील शिवाजी पाडळे चाळीत रविवारी रात्री नऊच्या सुमारास हि घटना घडली आहे . या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.

प्रभा रंगपिसे नावाच्या महिलेची मांजर शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर साळवे यांच्या घरात गेली होती. साळवे कुटुंब जेवत असताना मांजराने ताटात तोंड घातलं. त्यामुळे चिडलेल्या साळवेंनी मांजरीला घराबाहेर फेकून दिलं.हा प्रकार पाहून संतापलेल्या प्रभा रंगपिसे शेजाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या. त्यावेळी साळवेंनी चौघांना बोलावून प्रभा यांना लाथा-बुक्के, पाईप, बांबू यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या प्रभा यांचं निधन झालं.

साळवे आणि रंगपिसे कुटुंबात यापूर्वीपासून वाद होता, मात्र मांजरीवरुन झालेला वाद केवळ निमित्त ठरल्याचं म्हटलं जातं. पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगेमध्ये रविवारी रात्री 9 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलं आहे.