महिलेची १८ लाखांची फसवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक

महिलेची १८ लाखांची फसवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक

पुणे : दौंड शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी एका महिलेची १८ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आघाडीचा अध्यक्ष सचिन निळकंठ गायकवाड (रा. खवटे हॅास्पिटल जवळ, दौंड) व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष अल्ताफ महंमद मुलाणी (रा. दौंड कोर्टाजवळ, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दौंड तालुक्यातील लोणारवाडी येथे वर्षा सुभाष थोरात यांना एका पोल्ट्री शेड, निवासस्थान व मजुरांसाठी खोल्यांचे बांधकाम करायचे होते. त्याकरिता वर्षा थोरात यांनी २६ ऑक्टोबर २०२० रोजी करारनामा करून सचिन गायकवाड आणि अल्ताफ मुलाणी यांना कामासाठी कंत्राट दिले होते. या कामासाठी दोन्ही आरोपींनी अनेकदा धनादेशाद्वारे १७ लाख ५० हजार रूपये आणि रोख १२ हजार स्विकारण्यासह ३८ हजार रूपयांचे बांधकाम साहित्य घेतले होते. करारनाम्याप्रमाणे बांधकाम १५ एप्रिल २०२१ पूर्वी करायचे होते. मात्र, दोघांनीही काम पूर्ण केले नाही. उलट यात रकमेचा अपहार केल्याची फिर्याद वर्षा थोरात यांनी दिली आहे.

फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले सचिन गायकवाड व अल्ताफ मुलाणी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक करणे), ५०४ (फौजदारीपात्र धाकदपटशा करणे), ३४ (समान उद्देशाकरिता गुन्हेगारी कृती करणे) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव खराब झाले आहे. समाजसेवेच्या नावाखाली सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीच फसवणूक करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या