पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय काहींच राजकारण होत नाही – सुप्रिया सुळे

पुणे: शरद पवार शेतकरी आंदोलन भडकवत असल्याची टीका होत असतांना. ‘पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय काहींच राजकारण होत नाही.’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकाकारांना सुनावले.  शिक्षक भरतीसाठी पुण्यात सेन्ट्रल बिल्डींग जवळ सुरु असलेल्या उपोषण स्थळी सुळे यांनी  भेट दिली. यावेळी सुळे पत्रकारांसोबत बोलत होत्या.

राज्यात शेतकरी आंदोलन सुरु असून शरद पवार आंदोलन भडकावण्याच काम करत असल्याची टीका होत आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या “राज्याचा ५० वर्षाचा इतिहास आहे. जोपर्यंत पवार साहेबांवर टीका करत नाही तोपर्यंत काहींच राजकारण होत नाही. तसेच त्यांची बातमीही होत नाही. त्यामुळे जे सत्तेत त्याचं पवारसाहेबांवर टीका केल्याशिवाय राजकारण होत नाही. यातच त्याचं अपयश दिसत आहे.

दरम्यान, काल रविना टंडन यांनी आंदोलक शेतकऱ्यांना अटक करा आणि जमीनही देऊ नका असे म्हटले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, टंडन यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली. वास्तव्यापासून ते दूर असतात गरीब शेतकरी किती कष्ट करतात. याची जाणीव त्या महिलेला नाही आहे . असे त्यांनी स्पष्ट केले.