अडत्यांशिवाय बाजार समिती सुरु राहणार; आज झाली १२० वाहनांची आवक

पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाला व्यापार सुरू करण्यास पुणे बाजार समितीमधील अडते असोसिएशनच्या नकारावर ठाम राहिल्यानंतर, हतबल प्रशासनाने अखेर अडत्यांशिवाय बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे रविवारी (ता.२९) बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु होणार आहे.

कोरोनामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये फळे भाज्यांचा समावेश असताना, देखील पुणे बाजार समितीमधील व्यवहार सुरू करण्यासाठी बाजार समिती प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने देखील प्रयत्न केले. यासाठी अडते आणि कामगार संघटनांशी सातत्याने बैठका घेत, गर्दी आणि खबरदारीच्या उपाययोजना घेण्याचा विश्वास दाखविला तरी अडते असोसिएशनने ३१ मार्च पर्यंत बाजार बंदच्या भूमिकेवर ठाम राहिले. या भूमिकेनंतर अखेर अडत्यांशिवाय बाजार सुरू ठेवण्याची ठाम भूमिका प्रशासनाने घेतली असून, रविवारी (ता.२९) बाजार सुरळीत करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी रविवारी (ता.२९) भाजीपाला, सोमवारी (ता.३०) कांदा बटाटा आणि मंगळवारी (ता.३१) फळ विभाग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. खरेदीसाठी येणाऱ्या खरेदीदारांना शिस्तीने प्रवेश दिला जाणार असून, त्यांना कमीत कमी वेळेत खरेदी करुन बाजार आवरा बाहेर काढले जाणार आहे. यासाठीची सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे.

दरम्यान शुक्रवारी (ता.२७) बाजार समितीमध्ये लहान मोठ्या सुमारे १२० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. हा भाजीपाला अडत्यांशिवाय अतिशय कमी वेळेत विक्री देखील झाल्याची माहिती भाजीपाला विभागप्रमुख बाबा बिबवे यांनी दिली.

तर अडत्यांचे गाळे ताब्यात घेणार

अडत्यांना वारंवार विनंती करुन देखील अडते बाजार सुरु न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. राज्यातील सर्व प्रशासन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी झटत असताना, अडते मात्र आडमुठी भूमिका घेत असतील तर आपत्कालीन परिस्थिती कायद्यानुसार त्यांचे गाळे शासन ताब्यात घेण्याची कारवाई होण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कामगार कामावर येणार

अडते असोसिएशनने जरी ३१ मार्च पर्यंत बाजार बंदची भूमिका घेतली असली तरी, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनने सरकारच्या विनंतीनुसार बाजार समितीत कामावर येण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतचे पत्र युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिले आहे.