बायोबबलमुळे परदेशी खेळाडूंची माघार : सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

मुंबई : करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना आता खेळाडू कंटाळले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे का नाही असा प्रश्‍न ते विचारत असून ही सुरक्षा व विलगीकरण आता नको रे बाबा अशीच मते विविध क्रीडापटूंनी व्यक्त केली आहेत.

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली करोनापेक्षा जास्त भीती बायोबबलचीच घेतल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतूनही अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेतली असा दावा केला आहे. मागीलवर्षी करोनाच्या धोक्‍यामुळे आयपीएल स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली होती. मात्र, यावेळी ही स्पर्धा नेहमीप्रमाणे भारतातच होत आहे. परंतु करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. परदेशी खेळाडू आपल्या स्वातंत्र्याबाबत खूपच आग्रही असतात. त्यांना बायोबबलमध्ये जास्त राहता येणार नाही कारण ती त्यांची मानसिकताही नाही. त्या उलट भारतीय खेळाडू बायोबबलच काय पण कोणत्याही वातावरणात राहू शकतात. मानसिकदृष्ट्‌या भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त कणखर असतात, असेही गांगुली म्हणाले.

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या