fbpx

न्या. लोया प्रकरण : न्यायालयाच्या निकालाने विरोधक तोंडघशी पडले ?

टीम महाराष्ट्र देशा- न्या. ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाना साधणारे विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत स्वतंत्र चौकशीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने ठणकावत या प्रकरणात चार न्यायाधीशांनी दिलेल्या जबाबावर शंका घेण्याचे कारण नाही असं स्पष्ट केलंआहे. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे मात्र जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या लेखामुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर अमित शहा आणि भाजप सरकार वर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

असे करण्यात आले होते अमित शहा यांना विरोधकांकडून लक्ष्य

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यसभा आणि लोकसभेतील अनेक खासदारांची तशी मागणी आहे, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी विरोधीपक्ष नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली तर त्यांच्या कुटुंबालाही यातून न्याय मिळेल. या चौकशीसाठी 15 राजकीय पक्षांच्या 144 खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली गेली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याशिवाय राज ठाकरे यांनी एक भलामोठा कुत्रा ज्याला सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली शंका असं संबोधून, तो कुत्रा अमित शाहांच्या मागे लागला आहे, असं व्यंगचित्रात रेखाटलं . त्याच्या बाजूला न्यायमूर्ती लोया यांची कबर दाखवली आहे. त्यावर गाडले गेलेले ज. लोया प्रकरण असं लिहून, राज ठाकरे यांनी या कार्टूनला कबरची खबर असं म्हटलं होतं.

न्यायमूर्ती लोया यांना नियोजनपूर्वक मारलं असून, माझ्याकडे आलेल्या दोन जिल्हा न्यायाधीशांचीही हत्या झाल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केला.एका न्यायाधीशाला इमारतीवरुन फेकून दिलं तर एकाला रेल्वेतून फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर मृतदेहांचं शवविच्छेदन केलं नाही, तर एकाकडून सुसाईड नोट लिहून घेतल्याचंही त्यांनी म्हटलं तसेच माझाही चौथा नंबर असून हे माझं शेवटचं भाषण असू शकतं, अशी भिती त्यांनी नगरमध्ये बोलताना व्यक्त केली.

जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका ही मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेला बगल देण्यासाठीच दाखल झालीय. जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही डाववलं जात असल्याचा खळबळजनक आरोप बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अहमद आब्दी यांनी केला होता .