#Wistle_Podu : महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक वेळा प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात धडक मारणारा संघ…

CSK

दिग्विजय दीक्षित, पुणे : IPL च्या इतिहासात जिंकलेल्या सामन्यांची टक्केवारी पाहिली तर चेन्नई हा संघ सर्वोच्च स्थानावर आहे. याचबरोबर एकूण १२ IPL शृंखलांपैकी तब्बल १० वेळा प्रमुख ४ संघांमध्ये आणि तब्बल ८ वेळा अंतिम सामान्यांपर्यंत धडक मारणारा हा चेन्नई सुपर किंग्ज संघ…!

अगदी पहिल्या IPL पासूनच महेंद्रसिंग धोनी या स्टार खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपावल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाचे ओझे जणू हलकेच झाले कारण एक वर्षांपूर्वीच धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने T-२० विश्वचषक जिंकला होता. तरीही चेन्नईला त्यांचा पहिला IPL चषक जिंकायला तब्बल २०१० साल उजाडावे लागले. त्यावर्षी तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या संघाला हरवणे तितकेसे सोपे नव्हते परंतु सुरेश रैनाच्या धडाकेबाज कामगिरीने ही किमया करून दाखवली.

याबरोबरच चेन्नईने आपला फॉर्म साधत सलग ४ वेळा अंतिम सामन्यात धडक मारली. यातील केवळ २०११ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅल्लेंजर्स बेंगलोरला त्यांना नमावता आले आणि २०१२ साली कोलकाता, २०१३ साली मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला. २०१० साली अंतिम सामन्यात मुंबईला दाखवलेला पराभव मात्र त्यांना पुन्हा दाखवता येणे आजवर शक्य झालेले नाही.

मध्यंतरीच्या काळात राजस्थान आणि चेन्नईच्या संघांवर 2 वर्षांसाठी IPL मध्ये बंदी घातली गेली आणि चेन्नईमधील काही खेळाडू रायजिंग पुणे सुपर जायंट्स  तर काही खेळाडू गुजरात लायन्स संघाकडून खेळले. २०१८ साली ही बंदी उठवली गेली आणि पुन्हा एकदा पूर्वीच्या जोशात येत चेन्नईने हैद्राबादला मात देत तिसऱ्यांदा आपले नाव चषकावर कोरले. याबरोबर सर्वाधिक वेळा चषक जिंकण्यात मुंबईशी बरोबरी केली. अगदी मागील वर्षीही मोठ्या दिमाखात अंतिम सामन्यात पोहोचले परंतु अगदी जिंकत आलेला अंतिम सामना शेवटच्या षटकात केवळ १ धावेने हरला.

चेन्नईच्या या सगळ्या प्रवासात महेंद्रसिंग धोनीचे अफाट नेतृत्व त्याने गोलंदाजांची काढलेली पिसे, सुरेश रैनाची धमाकेदार फलंदाजी आणि सोबत अष्टपैलू जडेजाची कमाल यामुळे या संघाला भारतभर चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते.

विशेषतः २०१८ सालानंतर या संघातील खेळाडूंच्या ‘सरासरी वयाबद्दल’ माध्यमांमध्ये बरीच टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे. यावर्षीही चेन्नईच्या संघातील खेळाडूंचे सरासरी वय इतर संघापेक्षा जास्त आहे असे दिसते. यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी ‘वैयक्तिक’ कारण देत या चषकातून माघार घेतलेली आहे. या सर्व गोष्टीतून मार्गक्रमण करत यावर्षी दुबईतील IPL मध्ये कसे खेळतात याकडे सर्व क्रिकेटप्रेमींची नजर असेल, परंतु नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची कप्तानी नेहमीप्रमाणे नक्कीच यातून संघाला योग्य दिशा दाखवेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहेच.

महत्वाच्या बातम्या:-

सिक्सर किंग पुन्हा पंजाबकडून खेळणार

करोनाचा प्रादुर्भाव आता संपला ; भाजपा नेत्याचा दावा

भारत- चीनमध्ये तणाव मिटण्याची शक्यता