Share

Winter Session 2022 | “नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री…शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान” ; विरोधकांची खोचक घोषणाबाजी

Winter Session 2022 | मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे देखील समोर येत आहेत. अब्दुल सत्तार यांचा गायरान जमीन घोटाळा, कृषी व क्रिडा महोत्सवाप्रकरणी वसुलीचे आदेश, हे प्रकरण ताजे असताना मंत्री संजय राठोड यांचा जमीन घोटाळा देखील समोर आला आहे. विरोधक अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा म्हणून आक्रमक आहेत. आता संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू शकते. याप्रकरणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

“नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा…संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली…”, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संजय राठोडांवर आरोप काय –

संजय राठोड यांच्यावर वाशिममधील कारंजा लाड येथील गायरान जमीन वाटप केल्याचा आरोप करण्यात आले आहे. 25 कोटींची 2 एक्कर जमीन 2 व्यक्तींच्या नावावर केल्याचा आरोप आहे. तसे पत्र समोर आले आहे. संजय राठोड यांच्या आदेशाचे हे पत्र आहे. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबबत विधानसभेत माहिती दिली होती. अजित पवार म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाबूळ येथील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 44 मधील 37 एक्कर 19 गुंठे जमीनीचा घोटाळा झाला. किंमत काढली तर हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाहीत, असा सुप्रिम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले आहे. तेव्हाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा निकाल आणि राज्य सरकारच्या आदेशाची संपूर्ण माहिती असताना 37 एक्कर गायरान जमीन योगेश खंडागळे या व्यक्तिला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता.”

“तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय अवैध असल्याचे वाटले. त्यांनी 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. शिंदे सरकार सत्तेत आले होते. त्यात वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास कोर्टाचा अनादर होईल, असे कलेक्टरांनी नितीन करीरांना कळवले. या पत्रावर दुर्देवाने शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. यामध्ये राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. याची जबाबदारी स्वीकारून मंत्रिमहोदयांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले, “आणखी एक गंभीर प्रकरण आहे. सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व क्रीडा महोत्सवासाठीही अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केली. त्यासाठी दहापेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी प्लॅटिनिअम म्हणजे 25 हजार रुपयांच्या 30 प्रवेशिका खपवायच्या. डायमंड 15 हजारांच्या 50 प्रवेशिका खपवायच्या. 10 हजारच्या 75 प्रवेशिका खपवायच्या. साडेसात हजारांच्या सिल्वर 150 प्रवेशिका खपवायचे टार्गेट दिले आहे. हा भ्रष्टाचार नाही आहे का?. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा सरकारने केला.”

महत्वाच्या बातम्या : 

Winter Session 2022 | मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे देखील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now